बंद

    पोलीस यंत्रणा, महाराष्ट्र राज्य

    परिचय

    कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्याचा शोध करणे आणि गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही पोलिसांची मुख्य कामे आहेत. शिवाय गुन्हे टाळणे, गुन्हेगारावर खटले भरणे, कैद्यांना तसेच सरकारी तिजोरी, खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेला संरक्षण देणे, वाहतूक सुव्यवस्था चालू ठेवणे, स्फोटक पदार्थांची तपासणी करणे, पूर्वचारित्र्य तपासून पाहणे ही महत्त्वाची कामेही पोलीस करतात. या व्यतिरिक्त सामाजिक, आर्थिक विविधता कार्यान्वित करण्यासाठीसुध्दा पोलिसांना कामगिरी बजावावी लागते.

    ही सर्व कामे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असलेल्या २१,२९१ पोलीस अधिकारी व २,०८,६७१ पोलीस कर्मचारी असे एकूण २,२९,९६२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत पोलीस दल पार पाडते. या पोलीस दलाच्या नियंत्रण व प्रशासनाबाबतचे अधिकार, मुंबईत मुख्यालय असलेल्या महासंचालक व पोलीस महानिरीक्षकांना प्रदान करण्यात आले आहेत. अंतर्गत अर्थव्यवस्था, सर्वसाधारण प्रशिक्षण, पोलीस दलामध्ये शिस्तपालन, तसेच त्यांची कार्यक्षमता राखणे यासाठी ते जबाबदार आहेत. महासंचालक व पोलीस महानिरीक्षक आणि सहा अपर पोलीस महासंचालक यांमध्ये या कार्यभाराची विभागणी करण्यात आली आहे.

    पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे बृहन्मुंबई व महासंचालक, असीबी, महाराष्ट्र राज्य, मुंबई वगळून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियंत्रण, कार्यकारी व प्रशासकीय प्रमुख आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांना

    1. अपर पोलीस महासंचालक ( कायदा व सुव्यवस्था)
    2. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)
    3. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना)
    4. अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय)
    5. अपर पोलीस महासंचालक (तरतूद),
    6. अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा)
    7. विशेष पोलीस महानिरीक्षक ( कायदा व सुव्यवस्था)
    8. विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन)
    9. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना)
    10. विशेष पोलीस महानिरीक्षक (नि. वस.)
    11. सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) / सरसंपादन ( दक्षता) / (आस्था.) / (का. व सु.) (प्रशासन)

    ही सहायक पदे निर्माण केलेली आहेत.

    महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाचे १०४ घटक आहेत. त्यामध्ये १२ पोलीस आयुक्तालये, १ गुन्हे अन्वेषण विभाग, १ राज्य गुप्तवार्ता विभाग, ८ परिक्षेत्रे, ३६ पोलीस जिल्हे, ४ रेल्वे पोलीस जिल्हे, ०१ ते १६ व १८, १९ राज्य राखीव पोलीस दल गट, १ मोटार परिवहन विभाग, १४ प्रशिक्षण संस्था आणि १ राज्य पोलीस बिनतारी संदेश यंत्रणा यांचा समावेश होतो. बृहन्मुंबईसहित राज्यात एकूण १,१६५ पोलीस ठाणी आहेत.

    मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नवी मुंबई, अमरावती, पिंपरी-चिंचवड, मिरा भाईंदर-वसई-विरार व लोहमार्ग, मुंबई या १२ ठिकाणी पोलीस आयुक्तालये आहेत. या प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून अपर पोलीस महासंचालक/ विशेष पोलीस महानिरीक्षक/पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाचे अधिकारी पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत आणि त्यांना जिल्हादंडाधिकाऱ्यांचेही अधिकार आहेत.

    वरील पोलीस आयुक्तालये वगळता प्रशासकीय कारभारासाठी राज्याची आठ परिक्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या आठ परिक्षेत्रांपैकी सात परिक्षेत्राच्या प्रमुखपदी प्रत्येकी एक विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे व गडचिरोली परिक्षेत्र येथे पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी कार्यरत आहे. एका परिक्षेत्रात तीन ते पाच जिल्ह्यांचा समावेश असतो.

    1. महासंचालक अँटीकरप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई
    2. पोलीस महासंचालक, लोहमार्ग, मुंबई
    3. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण, खास पथक, मुंबई
    4. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
    5. आयुक्त व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
    6. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई
    7. अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई
    8. अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल, मुंबई
    9. अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई
    10. अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, मुंबई
    11. संचालक व अपर पोलीस महासंचालक, पोलीस बिनतारी संदेश यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे
    12. अपर पोलीस महासंचालक, अँटी-नक्षलाईट ऑपरेशन, नागपूर
    13. अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई
    14. संचालक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक
    15. विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, पुणे
    16. विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे
    17. विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, पुणे
    18. विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, नागपूर
    19. विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे

    मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य शासनाने दहशतवादी / अतिरेकी यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांचा प्रभावी व समर्थपणे मुकाबला करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एन. एस. जी. च्या धर्तीवर विशेष कमांडो पथक स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार शासन निर्णय, गृह विभाग, आय. एस. एस./१००९/प्र. क्र. ८४/विशा-४, दिनांक २ एप्रिल २००९ अन्वये राज्य सुरक्षा दलामध्ये फोर्स वनची स्थापना केली आहे. सध्या सदर फोर्स वन कमांडो पथकाचे मुख्यालय / कार्यालय गोरेगाव (पू.), मुंबई येथे कार्यरत आहे. सदर फोर्स वन मध्ये अपर पोलीस महासंचालक हे पथकाचे विभाग प्रमुख असून त्यांना सहायक म्हणून कृती विभागात १ पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक, ४३ पोलीस उपनिरीक्षक, ०२ सहायको पोलीस उपनिरीक्षक, ६२ पोलीस हवालदार, ११ पोलीस नाईक, २२२ पोलीस शिपाई, १३ कार्यालयीन कर्मचारी व १३ मेस कर्मचारी असे एकूण ४५० पदे, तसेच शासन निर्णय क्रमांक ओपीओ-०१०३/८१३६/प्र. क्र. १४३/पोल-३, दिनांक ३१ डिसेंबर २००९ अन्वये फोर्स वन अर्बन काऊंटर ट्रेनिंग अकादमीकरिता पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची एकूण ४४ पदे अशी एकूण ४९४ पदे आहेत.

    राज्यात दहशतवादी कारवायांना त्वरेने, वेगाने व परिणामकारकपणे आळा घालण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची स्थापना शासन निर्णय क्रमांक एसएसए-१०/०३/५/विशा-४, दिनांक ८ जुलै २००४ अन्वये करण्यात आलेली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून अपर पोलीस महासंचालक हे पद शासन निर्णय क्रमांक आयएसएस-१००९/प्र. क्र. ६०/विशा-४, दिनांक २७ जुलै २००९ अन्वये निर्माण करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी पथक, नागपूर, औरंगाबाद, उपपथक पुणे, नाशिक, अकोला, नांदेड येथे कार्यरत आहेत. दहशतवाद विरोधी पथक मुंबई उर्वरित महाराष्ट्र यांचे लेखा व आस्थापनाविषयक कामकाज मुंबई येथील मुख्य कार्यालयातून एकत्रितरित्या करण्यासाठी करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. सदर दहशतवादविरोधी पथकामध्ये अपर पोलीस महासंचालक विभाग प्रमुख असून त्यांना सहायक म्हणून कृती विभागात १ विशेष पोलीस महानिरीक्षक, १ पोलीस उपमहानिरीक्षक, ४ पोलीस उपायुक्त, १० सहायक पोलीस आयुक्त, ४५ पोलीस निरीक्षक, ६५ सहायक पोलीस निरीक्षक, ८० पोलीस उपनिरीक्षक, ११ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ७० पोलीस हवालदार, २१६ पोलीस नाईक, २०९ पोलीस शिपाई व २५ प्रशासकीय / कार्यालयीन कर्मचारी वर्ग असे एकूण ७४१ पदे निर्माण केलेली आहेत.

    राज्यामध्ये सध्या राज्य राखीव पोलीस दलाचे एकूण १६ गट आहेत. सदर गटांमध्ये ५३४ अधिकारी व १५,६३४ पोलीस कर्मचारी असे एकूण १६,१६८ इतके पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि, विशेष कामासाठी जिल्ह्यांना या गटांमधून जादा मनुष्यबळ दिले जाते. बहवंशी संरक्षण दलाच्या पध्दतीचे शिक्षण या राखीव पोलीस दलाला दिले जाते. गंभीर स्वरूपाच्या दंगली व आकस्मिक परिस्थितीला तोंड देणेकामी जिल्हा पोलीस दलास मदत करण्यासाठी हे गट सज्ज ठेवण्यात येतात. अशा रीतीने पोलीस दलाची कार्यपध्दती चालते.

    पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे कार्यकारी व प्रशासकीय प्रमुख आहेत, त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांना सहपोलीस आयुक्त (गुन्हे-२), सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), सहपोलीस आयुक्त (प्रशासन) व सहपोलीस आयुक्त (वाहतूक) ही पाच पदे सहायक म्हणून दिलेली आहेत, या व्यतिरिक्त ११ अपर पोलीस आयुक्त (पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मिळून) दिलेले आहेत आणि ४२ पोलीस उपायुक्त आहेत. त्याचप्रमाणे १३८ सहायक पोलीस आयुक्त, १०७६ पोलीस निरीक्षक, १०९३ सहायक पोलीस निरीक्षक, ३५१६ पोलीस उपनिरीक्षक, ४२९३ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ११९८९ पोलीस हवालदार १५६ पोलीस नाईक तांत्रिक, २८९३९ पोलीस शिपाई असे एकूण ५८८२ पोलीस अधिकारी व ४५३७७ पोलीस कर्मचारी मिळून एकूण ५१२५९ कर्मचारी आहेत आणि मंत्रालयीन कर्मचारी वर्ग १, २, ३ व ४ एकूण १३५९ कर्मचारी कार्यरत आहेत व ५२ विधी अधिकारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत.

    कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासन यामध्ये पोलीस आयुक्तांचे सरळ ओझे कमी करण्यासाठी सहपोलीस आयुक्त त्यांना मदत करतात प्रशासकीय बाबतीत त्यांना मदत करण्यासाठी सहपोलीस आयुक्त (प्रशासन) व पोलीस उपआयुक्त (मुख्यालय १), पोलीस उपआयुक्त (मुख्यालय-२) यांची नियुक्ती केलेली आहे. बृहन्मुंबईतील कायदा व सुव्यवस्था योग्यरीतीने हाताळण्यासाठी अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग व अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग असे पाच अधिकारी आहेत. बृहन्मुंबईतील गंभीर स्वरूपाचे गुन्हे हाताळणे व अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राबविण्यासाठी योजनेसाठी सहपोलीस आयुक्त, गुन्हे व सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे) यांना मदत करण्यासाठी पोलीस उपआयुक्त, गुन्हे व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तसेच आठ पोलीस उपआयुक्त यांची नेमणूक केलेली आहे. मुंबई शहरामध्ये सामाजिक हालचालींवर लक्ष ठेवून कोणताही गैरप्रकार होऊ नये याबाबत दखल घेण्यासाठी व विशेष शाखा एक-ई ही शाखा निर्माण करून त्यासाठी एक अपर पोलीस आयुक्त व एक पोलीस उपआयुक्त यांची नेमणूक केलेली आहे. तसेच विशेष शाखा एक मध्ये सुरक्षा व संरक्षण, स्वतंत्ररित्या हाताळण्यासाठी एक अपर पोलीस आयुक्त व तीन पोलीस उपआयुक्त ही पदे अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे बृहन्मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सशस्त्र दलावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अपर पोलीस आयुक्त ब पाच पोलीस उपआयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच शहरामध्ये उद्भवणाऱ्या दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन दंगल काबू पथके तयार केली असून त्याकरिता एक पोलीस उपआयुक्त व दोन सहायक पोलीस आयुक्त अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत. बृहन्मुंबईतील वाहतूक नियंत्रण कामाची देखरेख करण्यासाठी आणि तद्संबंधी विविध योजना राबविण्यासाठी एक सहपोलीस आयुक्त, एक अपर पोलीस आयुक्त व चार पोलीस उपआयुक्त यांची नेमणूक केलेली आहे. मोटार परिवहन विभागातील आणि बिनतारी संदेश विभागातील तांत्रिक कामाच्या देखरेखीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन पोलीस उपआयुक्त नियुक्त केलेले आहेत. बृहन्मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) व एक पोलीस उपआयुक्त अभियान हे आहेत. तसेच बृहन्मुंबईसाठी एक स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कोष असून त्यासाठी एक पोलीस उपआयुक्त आहे. बृहन्मुंबईतील ९४ पोलीस ठाणी पाच प्रादेशिक विभागात विभागलेली आहेत. या प्रत्येक प्रादेशिक विभागाच्या अधिपत्याखाली प्रत्येक परिमंडळाला एक पोलीस उपआयुक्त नेमलेला आहे. सध्या तेरा परिमंडल कार्यालये आहेत, पोलीस उपआयुक्तांना योग्य त्या प्रमाणात मदतनीस म्हणून सहायक पोलीस आयुक्त दिलेले आहेत आणि पोलीस ठाणी / विभाग शाखा यांच्या कार्यक्षेत्रात येणारी लोकसंख्या गुन्हेगारांची संख्या पोलीस ठाण्याचा परिसर (क्षेत्रफळ) लक्षात घेऊन इतर गौण कर्मचारी वर्ग देण्यात आलेला आहे व अशा पध्दतीने बृहन्मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य केले जाते.

    बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कामासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी दोन पध्दतीच्या प्रशासकीय कामकाजासाठी वर्ग २ दर्जाचे १५ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, २४ प्रशासकीय अधिकारी नेमलेले आहेत. अशा पध्दतीने बृहन्मुंबई पोलीस दलाची कार्यपध्दती चालते.

    महिला गुन्हेगार व महिला तक्रारदार यांची प्रकरणे हाताळण्यासाठी वेगवेगळ्या महिला अधिकारी व महिला पोलीस शिपाई यांची नेमणूक केलेली आहे.

    पोलीस संचार यंत्रणा कार्यक्षम व मजबूत व्हावी म्हणून पोलीस नियंत्रण कक्षाचे विक्रेंद्रीकरण करून एकूण पाच प्रादेशिक नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई पोलीस दलासाठी निर्माण करण्यात आले आहेत. सध्या एकूण सहा नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

    शासनाने दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर दिनांक ३१ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयान्वये २६ जलद प्रतिसाद पथके निर्माण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. एका जलद प्रतिसाद पथकामध्ये ४ तुकड्या असतील, एका तुकडीमध्ये २ सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि १२ पोलीस शिपाई असा एकूण १४ पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश आहे. म्हणजेच एका जलद प्रतिसाद पथकामध्ये ८ पोलीस अधिकारी व ४८ पोलीस अंमलदार असे एकूण ५६ पोलीस अधिकारी / कर्मचारी कार्यरत असतील. अशाप्रकारे एका जलद पथकाची रचना करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या अधिनस्त दिनांक १ फेब्रुवारी २०१० पासून पाच प्रादेशिक विभागांमध्ये प्रत्येकी २ पथके व मुख्यालयास २ पथके अशी एकूण १२ जलद प्रतिसाद पथके निर्माण करण्यात आलेली आहेत, तसेच दिनांक ४ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३ जलद प्रतिसाद पथके निर्माण करणे करिता १६८ पदे मंजूर झाल्यामुळे सशस्त्र पोलीस दलाच्या अधिनस्त ३ जलद प्रतिसाद पथके निर्माण करण्यात आली, अशी एकूण १५ जलद प्रतिसाद पथके पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत आहेत.

    राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे

    कार्यप्रणाली

    गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे हा पोलीस खात्यातील महत्त्वाचा विशेष विभाग आहे. या विभागाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता असून हा विभाग अपर पोलीस महासंचालक यांचे नियंत्रणाखाली कार्यरत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडील विविध गुन्ह्यांच्या तपास कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रणाचे काम विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पूर्व विभाग), विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे-पश्चिम विभाग) विशेष पोलीस महानिरीक्षक (राज्य गुन्हे अन्वेषण अभिलेख केंद्र), उपमहानिरीक्षक (आर्थिक गुन्हे विभाग), उपमहानिरीक्षक, (प्रशासन) तसेच पोलीस अधीक्षक (पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, कोकण भवन, अमरावती आर्थिक गुन्हे, का. व सं. तांत्रिक) यांचेद्वारे केले जाते. गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस अधीक्षक (१) पुणे, (२) नागपूर, (३) अमरावती, (४) औरंगाबाद, (५) नाशिक, (६) कोकण भवन (७) कोल्हापूर अशी सात पथके पोलीस अधीक्षकांच्या थेट नियंत्रणाखाली असून, ते राज्यातील गुन्ह्यांच्या संदर्भात प्रतिबंध, तपास आणि गुन्ह्यांची उकल या कामात पर्यवेक्षण व नियंत्रण करतात. गुन्हे अन्वेषण विभागाकडे मा. उच्चन्यायालय, महाराष्ट्र शासन किंवा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी सोपविलेल्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या व व्यापक स्वरूपाच्या तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यांचे तपासाचे कामकाज चालते. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक किंवा महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे संवेदनशील स्वरूपाच्या गुन्ह्यांतील, गुप्त चौकशीचे कामकाज गुन्हे अन्वेषण विभाग करते. पोलीस व्यवस्थापनाचा अभ्यास गुन्हेगारीबाबतचे संशोधनशास्त्र, सहकारी संस्थामधील गैरव्यवहाराबाबतचा तपास जातीय तणावामुळे उद्भवणारे गुन्हे औषध भेसळ इत्यादी विषयाच्या अनुषंगाने वेळोवेळी सोपविण्यात आलेले तपास असे कामकाज गुन्हे अन्वेषण विभाग करते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अखत्यारीतील पोलीस श्वान पथकाची नुकतीच पुनर्रचना करून, पोलीस श्वान पथकाचे प्रभावी नियंत्रण देखभाल व निरीक्षणासाठी आयुक्तालय व जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

    राज्य गुन्हे अन्वेषण विभागाखाली वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे कामकाज हाताळले जाते.

    1. सराईत गुन्हेगार.
    2. खास सरहद्दीवरील जिल्ह्याच्या राज्यातील गुन्हेगारी.
    3. गुन्हे गुप्तवार्ता राजपत्राचे प्रकाशन.
    4. राज्य गुन्हे कार्यप्रणाली केंद्राचे व्यवस्थापन.
    5. राज्य अंगुली मुद्रा केंद्राचे व्यवस्थापन
    6. राज्य हस्ताक्षर आणि छायाचित्रण विभाग व्यवस्थापन.
    7. सांख्यिकी शाखेचे व्यवस्थापन.
    8. कायदा व संशोधन पथकाचे व्यवस्थापन.
    9. तपासकामी आवश्यक असणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स लॅब पोस्ट व तार खाते, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या इतर संस्थांशी समन्वयाचे काम करते.

    अंगुली मुद्रा केंद्राची सध्याची माहिती

    महाराष्ट्र राज्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिपत्याखाली अंगुली मुद्रा केंद्राची स्थापना सन १८९९ साली पुणे येथे झाली. पुणे व्यतिरिक्त सध्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथे तीन विभागीय अंगुली मुद्रा केंद्र कार्यरत असून तेथे अटक आरोपींच्या शोधपत्रिकांची अभिलेखावर तपासणी, शिक्षाप्राप्त आरोपींचे अभिलेखसंग्रह, तसेच गुन्ह्यास्थळी विकसित केलेल्या अज्ञात इसमांच्या चान्सप्रिंटसच्या पडताळणीचे कामकाज चालते. आधुनिक संगणकीय व दळणवळणाच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित फिंगर प्रिंट अॅनालिसिस अॅन्ड क्रिमिनल ट्रेसिंग सिस्टीम (फॅक्टस्) ही संगणकीय यंत्रणा जुलै २००४ पासून कार्यान्वित करण्यात आली होती. सदर यंत्रणेवर ५,६०,००० गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे संग्रहित करण्यात आले होते. सदरील संगणकीय प्रणाली माहे जून २०१२ पासून बंद झाली आहे. त्यामुळे कामकाज हे पूर्वीप्रमाणेच (मॅन्युअली) केले जात आहे.

    सन २०१६ मध्ये ४५ मोबाईल फॉरेन्सिक इव्हेस्टीगेशन व्हॅन १८ किट बॅगसह लोहमार्ग व्यतिरिक्त सर्व जिल्ह्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या असून त्यांचे ४२ जिल्ह्यांना वाटप करण्यात आले आहे.

    ४ अंगुली मुद्रा केंद्र व ४२ जिल्ह्यांचे ठिकाणी असे एकूण मंजूर २९३ पैकी हजर १९० अंगुली मुद्रा अधिकारी आधुनिक तपासणी उपकरणे व साहित्यांसह अंगुली मुद्रा कामकाज पाहतात.

    सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने ऑटोमेटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (एएमबीआयएस) या संगणकीय प्रणालीस अंगुली मुद्रा केंद्रातील शिक्षाप्राप्त व अटक आरोपींच्या अभिलेख पत्रिकांचे संगणकीकरण करण्यास मंजुरी दिली. (एएमबीआयएस) संगणकीय प्रणालीची कामकाज प्रक्रिया सुरू असून सध्या डाटा कन्व्हर्जन म्हणजे अंगुली मुद्रा अभिलेख पत्रिकांचे स्कॅनिंगचे तसेच त्यावरील अटक व शिक्षाप्राप्त आरोपींची वैयक्तीक माहिती सदर संगणक प्रणालीवर भरण्याचे कामकाज राज्यातील चारही अंगुली मुद्रा केंद्रामध्ये पूर्ण झालेले आहे. प्रणालीत भरलेल्या अंगुली मुद्रा पत्रिकांचे १०० टक्के (माहितीचे वैधीकरण) चे कामकाज पूर्ण झाले आहे. (एएमबीआयएस) संगणकीय प्रणालीचे प्रशिक्षण सर्व अंगुली मुद्रा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या प्रणालींमध्ये शिक्षाप्राप्त व अटक आरोपींच्या १० बोटांच्या ठशांसह हाताचा पंजा व पूर्वी शोध / माग न लागलेल्या (घटना स्थळावर प्राप्त) चान्सप्रिंट, चेहरेपट्टी, फोटो व डोळ्यांचे आयरिस (आयआरआयएस) डाटा संग्रहित करण्यात येणार आहे. सदर प्रणाली २४ तास चालू राहणार असून त्याद्वारे अल्पावधीत निकाल प्राप्त होणार आहेत. सदर प्रणालीला दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी उच्चाधिकार समिती मध्ये एएमबीआयएस गो लाईव्ह सरकारच्या अधीन आहे. अनुमोदन अशी मान्यता मिळाली आहे.

    अंगुली मुद्राशास्त्र हे व्यक्तिगत ओळख पटविण्याचे परिपूर्ण शास्त्र असून ते व्यक्तीपरत्वे भिन्नता व अपरिवर्तनशीलता या दोन मूल तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या तळहात / तळपाय / बोटावरील घर्षणजन्य त्वचेवर असलेल्या रेषा या एकमेव / अद्वितीय व शाश्वत असून व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत रेषांमध्ये काहीही बदल होत नाही.

    बोटांच्या ठशांचे उपयोग- बोटांच्या ठशांच्या सहाय्याने कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीची ओळख पटविता येते. पोलीस, बैंक, वित्तीय संस्था, न्यायालय, पारपत्र कार्यालय, निवडणूक आयोग, इस्पितळे इत्यादी ठिकाणी बोटांच्या ठशाच्या साहाय्याने व्यक्तिगत ओळख पटविता येते.

    अंगुली मुद्रा केंद्रातील कामकाज

    1. अटक व शिक्षा झालेल्या आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिकांचे अभिलेख संग्रहण करणे.
    2. पोलीस दैनंदिन कामकाजात अनेक इसमांना अटक करतात. त्यापैकी काही आरोपींना पूर्वशिक्षा असतात. पोलीस ठाण्यामध्ये अटक केलेल्या इसमांची दहा बोटांची अंगुली मुद्रा पत्रिका घेऊन ती अंगुली मुद्रा केंद्रात पूर्वशिक्षा तपासणीसाठी पाठविले जाते. या अंगुली मुद्रा पत्रिकेला शोधपत्रिका असे संबोधले जाते. शोधपत्रिका अन्वेषित झाल्यास संबंधित तपासणी अंमलदारास अंगुली मुद्रा केंद्राकडून त्याच्या पूर्व शिक्षेची माहिती, आरोपीचा संपूर्ण तपशील जसे तडीपार, फरारी इसम, गुन्हे कार्यप्रणालीच्या नोंदी इत्यादी कळविल्या जातात. न्यायालयात आरोपींसाठी पोलीस कोठडी मिळविणे, शिक्षा फर्माविणेकामी सदरील माहिती उपयुक्त ठरते.
    3. अंगुली मुद्रा केंद्रात वादग्रस्त दस्तऐवजामधील ठशांवर अंगुली मुद्रा तज्ज्ञ मतप्रदर्शन देण्याबाबतची प्रकरणे दरवर्षी पोलीस ठाणे, न्यायालये, बँका, शासकीय, निमशासकीय कार्यालये, सैन्यदले व खाजगी इसम यांचेकडून प्राप्त होत असतात. वादग्रस्त दस्तऐवजांमधील अंगठ्यांच्या ठशांशी संबंधित नमुना ठसे हे मान्य ठशांबरोबर अंगुली मुद्रा शास्त्राप्रमाणे तुलनात्मक तपासणी करून अंगुली मुद्रा तज्ज्ञ आपले मत तयार करून संबंधित अंगुली मुद्रा केंद्रातील संचालक/ पोलीस अधीक्षक (अंगुली मुद्रा) अथवा उपसंचालक/पोलीस उपअधीक्षक (अंगुली मुद्रा) यांचेकडे छाननीसाठी व अंतिम मतप्रदर्शनासाठी सादर करतात. संचालक/ पोलीस अधीक्षक (अंगुली मुद्रा) अथवा उपसंचालक / पोलीस उपअधीक्षक (अंगुली मुद्रा) यांचे स्वाक्षरीने अंतिम मतप्रदर्शन पाठविले जाते. शासकीय कार्यालये वगळता नियमाप्रमाणे खाजगी इसमांकडून तपासणी करणेसाठी शुल्क आकारणी केली जाते.
    4. अंगुली मुद्रा तज्ज्ञ वेगवेगळ्या गुन्ह्यांचे ठिकाणी पोलीस ठाण्यांकडून संदेश प्राप्त झालेनंतर गुन्हेगारांनी हाताळलेल्या वस्तूंवरील बोटांचे अदृश्य ठसे विकसित करतात, त्यांना चान्सप्रिंटस म्हणतात. चान्सप्रिंटसची पडताळणी दैनंदिन अटक आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, संबंधितांच्या ठसे पत्रिका, गुन्हेगारांचे अभिलेख, तसेच फिर्यादीकडील सर्व इसमांच्या अंगुली मुद्रा पत्रिकावरील ठशांशी पडताळणी करून त्यावरून मतप्रदर्शन देण्याचे काम अविरत करत असतात. तसेच चान्सप्रिंटद्वारा गुन्हा प्रकट झाल्यास त्याबाबतच्या साक्षी / पुराव्यासाठी अंगुली मुद्रा तज्ज्ञ शासनाच्यावतीने न्यायालयात हजर राहतात.
    5. ठसे विकसित करण्यासाठी पॉलिरे, सेप्रीगन डस्टप्रिंट लिफ्टर इत्यादी आधुनिक उपकरणांचा वापर केला जातो.
    6. राज्य हस्ताक्षर आणि छायाचित्रण विभाग व्यवस्थापन.
    7. परदेशगमन करणाऱ्या नागरिकांची त्यांनी मागणी केल्यानुसार १० बोटांची अंगुली मुद्रा पत्रिका शासकीय मूल्य आकारून तयार केली जाते.

    श्वान पथकाची माहिती

    राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली ४६ श्वानपथक कार्यरत असून त्यांची हाताळणी करण्यासाठी प्रत्येक घटकामध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी (डॉग मास्टर) असून त्यांचे हाताखाली प्रत्येक श्वानाकरिता २ श्वान हस्तक हवालदार/एक पोलीस शिपाई दर्जाचे असतात. त्यामध्ये ३५० श्वान कार्यरत आहेत. (संपूर्ण महाराष्ट्रातील श्वान पथकांमध्ये २८८ के बीडीडीएस १२२ = ३५० श्वान आहेत.

    हस्ताक्षर व छायाचित्रण विभाग, महाराष्ट्र राज्य

    हस्ताक्षर व छायाचित्रण विभागांतर्गत पोलीस ठाणे, मा. उच्च न्यायालये, मा. सत्र न्यायालये, मा. दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडील विभागीय चौकशी इत्यादी वादग्रस्त प्रकरणातील दस्तऐवजांचे परिक्षण करून तज्ज्ञांकडून अभिप्राय दिला जातो या विभागांतर्गत पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद अशी चार ठिकाणी केंद्रे कार्यरत आहेत. पुणे कार्यालयांतर्गत १४ जिल्हे व ०७ आयुक्तालये आहेत. मुंबई कार्यालयांतर्गत संपूर्ण बृहन्मुंबई आहे. नागपूर शाखा विदर्भातील ११ जिल्हे व २ आयुक्तालये आहेत. तसेच, औरंगाबाद कार्यालयांतर्गत ९ जिल्हे व १ आयुक्तालय आहे.

    हस्ताक्षर व छायाचित्रण विभागात बनावट सह्या वादग्रस्त हस्ताक्षर खाडाखोड, हस्ताक्षरात बदल करणे (आल्टरेशन), ‘निनावी पत्रे टंकलेखन, बनावट दस्तऐवज (तयार केलेली कागदपत्रे), संगणकाची प्रिंट, रेषेचा क्रम ओळखणे (स्ट्रोकचा क्रम), शिक्का, प्रिंटरवर काढलेला मजकूर इत्यादींचे परिक्षण केले जाते.

    या विभागातील दस्तऐवज परीक्षक हे दस्तऐवजांचे परिक्षण करून तज्ज्ञ अभिप्राय देतात व संबंधित न्यायालयामध्ये तज्ज्ञ साक्ष देऊन दिलेला अभिप्राय सिद्ध करून न्यायालयामध्ये मदत करतात. हस्ताक्षर विभागांतर्गत छायाचित्रण शाखा ह्या पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी आहेत. छायाचित्रण शाखा ही दस्तऐवज परिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दस्तऐवजांचे छायाचित्रण करतात. तसेच अंगुलीमुद्रा, गुन्ह्यांचे ठिकाण, चान्सप्रिंट, अपघाताचे ठिकाण इत्यादींचे छायाचित्रण करतात.
    (क) हस्ताक्षर विभागामध्ये खालील प्रकारचे वादग्रस्त दस्तऐवज परिक्षणासाठी येतात.

    1. वादग्रस्त सह्या.
    2. वादग्रस्त लिखाण
    3. लिखाणात केलेले बदल.
    4. खऱ्या दस्तऐवजांवर चुकीच्या पद्धतीने किंवा फसव्यारितीने बंदल करणे.
    5. निनावी पत्रे.
    6. दोन हस्ताक्षरांच्या मध्ये लिहिलेले अक्षर.
    7. रेषेचा क्रम ओळखणे.
    8. भौतिक व रासायनिक खाडाखोड.
    9. रबरी शिक्के.
    10. टंकलेखन, छापील दस्तऐवज.
    11. धमकी पत्रे, आत्महत्या करताना लिहिलेली चिठ्ठी

    या विभागातील दस्तऐवज परिक्षक हे दस्तऐवजांबाबत वेगवेगळ्या मा. न्यायालयामध्ये तज्ज्ञ साक्षी देऊन न्यायदानामध्ये मदत करतात, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील छायाचित्रण उपकेंद्रामध्ये खालील वर्गीकृत प्रकरणांमध्ये छायाचित्रे काढली जातात.

    1. दस्तऐवज तपासणीसांच्या कामातील दस्तऐवज.
    2. अंगुलीमुद्रा केंद्राकडील दस्तऐवज.
    3. चान्सप्रिंट प्रकरणे.
    4. एम. ओ. बी. गुन्हेगार.

    अँटीकरप्शन ब्युरो

    महासंचालक, अँटीकरप्शन ब्युरो हे विभाग प्रमुख असून पोलीस महासंचालक या दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली २ अपर महासंचालक, १ अपर पोलीस आयुक्त / पोलीस उपमहानिरीक्षक, ७ पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, ५ उपसंचालक, १६ अपर पोलीस उपआयुक्त / अपर पोलीस अधीक्षक, ९५ पोलीस उपअधीक्षक, १६९ पोलीस निरीक्षक, १ विधी सल्लागार, ७ विधी अधिकारी, ११२१ पोलीस कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांसह एकूण १४२५ अधिकारी / कर्मचारी मंजूर आहेत. यामध्ये शासनाने गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक ओपीओ-३११०/प्र. क्र. ४२८/पोल-३, दिनांक १५ जून २०११ द्वारे मंजूर केलेल्या २२८ पदांचा समावेश आहे.

    अँटीकरप्शन ब्युरो लाचलुचपत, भ्रष्टाचार, फौजदारी गुन्ह्याच्या स्वरूपाचे गैरवर्तन, शासकीय पैशाचा अपहार आणि कर्मचाऱ्यांची इतर भ्रष्टाचारी कृती या संबंधात चौकशी करते. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम २ (क) अंतर्गत लोकसेवक म्हणून विशद केलेले सर्व राज्य शासकीय कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे उदा. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था, महामंडळे यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी ब्युरोमार्फत होते.

    न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा

    राज्यातील न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पोलीस अन्वेषण अधिकाऱ्यांना गुन्हा संशोधन कार्यातील आधुनिकीकरण करण्यासाठी शास्त्रीय मदत पुरवितात. या संचालनालयाचे काम प्रत्यक्षपणे शासनाच्या गृह विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालते. प्रयोगशाळेचे मुख्यालय मुंबई येथे असून पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथेही प्रादेशिक प्रयोगशाळा आहेत. ह्या प्रयोगशाळांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण विश्लेषण अहवालामुळे पोलीस खात्याला गुन्हा अन्वेषणामध्ये आणि न्यायखात्याला न्यायदानामध्ये मदत होते.

    राज्यातील न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पोलीस अन्वेषण अधिकाऱ्यांना गुन्हा संशोधन कार्यातील आधुनिकीकरण करण्यासाठी शास्त्रीय मदत पुरवितात. या संचालनालयाचे काम प्रत्यक्षपणे शासनाच्या गृह विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालते. प्रयोगशाळेचे मुख्यालय मुंबई येथे असून पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथेही प्रादेशिक प्रयोगशाळा आहेत. ह्या प्रयोगशाळांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण विश्लेषण अहवालामुळे पोलीस खात्याला गुन्हा अन्वेषणामध्ये आणि न्यायखात्याला न्यायदानामध्ये मदत होते.

    गेल्या काही वर्षात ह्या प्रयोगशाळांतील कामाचा बोजा प्रमाणात्मकदृष्ट्या बराच वाढलेला आहे, तसेच त्यातील विविधताही वाढली आहे. प्रयोगशाळा आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून येथे उच्चशिक्षित व अनुभवी शास्त्रज्ञ करीत आहेत.

    मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथील प्रयोगशाळा त्यांच्या स्वतःच्या बांधलेल्या इमारतीमध्ये समाधानकारकपणे काम करीत आहेत. तसेच अमरावती येथे सन २००८ मध्ये नवीन प्रयोगशाळा भाडेतत्त्वावर सुरू करण्यात आलेली आहे.

    सन २००६-०७ मध्ये नार्को अनालिसीस ब्रेन फिंगर प्रिंटींग टेप अनालेसीस लाय डिटेक्सेन, सायबर फॉरेन्सिक स्पिकर आयडेंटीफीकेशन तंत्रज्ञान या प्रयोगशाळेत सुरू करण्यात आलेले आहे.

    • दूरध्वनी : 22822631
    • पत्ता : महाराष्ट्र पोलिस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४००००१